मुडदा घर

मुडदा घर

murda ghar horror story

Murda ghar horror story : "हि आमच्या डॉक्टर काकांकडून ऐकलेली एक घटना. साधारण चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आमचे डॉक्टर काका मिरजच्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होते. मेडिकल कॉलेज तसे बरेच जुने आणि सरकारी. इस्पितळात एक मुडदा घर होते. त्या मुडदा घराबद्दल बरेच प्रवाद ऐकिवात होते. कोणी म्हणे तेथे रात्री आत्मे फिरतात. रात्री बारा नंतर तेथे रडण्याचे, ओरडण्याचे आणि इतर विचित्र आवाज येत असतात. एका वार्ड बॉयला येथे रात्रपाळी करीत असताना महिलेचा रडण्याचा आवाज आला. खिडकीतून वाकून बघतले असता एक जळलेली स्त्री तिच्या पलंगावर उठून बसलेली त्याला दिसली. ते पाहून तो तेथून पळत सुटला ते परत आलाच नाही.

त्यांच्या कॉलेज मध्ये एक मुलांचा ग्रुप होता. एकदा रात्री गप्पा मारता मारता पैज लागली. जो कोणी मुडदा घरात रात्री बारा नंतर एक तास थांबून परत येईल त्याला हजार रुपये. सात आठ जणांच्या त्या ग्रुप मधल्या एका मुलाने ती पैज स्वीकारली. विराज असे त्या मुलाचे नाव होते.

दुसऱ्या दिवशीच्या रात्री सर्व तयारी झाली. मुडदा घराबाहेररील दरवानाला थोडे फार पैसे आणि दारूची एक बाटली देऊन तेथून कटवण्यात आले. रात्री ठीक बाराच्या सुमारास विराज तयार झाला. मुडदा घराचे कुलूप उघडले आणि तो आत शिरला. दार मागे लोटून दिले तसे बाहेरच्या मुलांनी टाळा परत लावून दार बंद करून घेतले.

मुडदा घरात भयाण शांतता पसरली होती. खिडक्यांमधून अंधुक प्रकाश मुडदा घरात पसरला होता. पहिली पाच मिनिटे विराज दरवाजा जवळील भिंतीला टेकून फक्त समोर बघत होता. काही वेळ गेल्यावर तो खाली बसला. धीटपणा असला तरी भीती मनात हळू हळू दाटत होती. 

रात्री बाराचा सुमार आणि भयाण अशा काळोखात मुडदा घरात आपण एकटेच या विचारांनी विराज थोडा अस्वस्थ होऊ लागला होता. वीस मिनिटे उलटली होती. विराज तसाच बसून होता. डोळे टक्क उघडे होते. मुडदा घरात स्थब्ध वातावरण होते. विराजच्या समोर ओळीने पलंग होते आणि त्यावर ठेवेलेले मुडदे. विराज हळू हळू एक एक करून सर्व प्रेतांवरून त्याची नजर फिरवीत होता. निचेतन होऊन पडलेल्या त्या मृत शरीरांसोबत एका बंद खोलीत आपण एकटे बसलो आहोत हि जाणीवच हृदय गोठवणारी आहे. एक क्षण विराजला हि पैज स्वीकारल्याबद्दल पश्चाताप हि झाला.

मुडदा घराची शेवटची खिडकी उघडी होती तेथून प्रकाशाचा झोत सरळ एका प्रेतावर पडत होता. विराजची नजर त्या प्रेतावर पडली. का कुणास ठाऊक पण विराजला अंधुकशी हालचाल त्या पलंगावर जाणवली. विराजच्या अंगातून भीतीची लहर सळसळ करीत थेट मेंदूत घुसली. विराज उठून उभा राहिला. भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले होते.

आणि अचानक....

शेवटच्या पलंगावरची हालचाल आता स्पष्ट विराजला दिसू लागली. हळू हळू ते प्रेत त्याच्या जागेवर उठून बसू लागले होते. अंगावरची पांढरी चादर तशीच त्या प्रेतावर पसरली होती. विराजच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. ओरडण्यासाठी त्याने आ वासला पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. ते प्रेत आता कमरेतून सरळ होत पलंगावर उठून बसले होते. डोक्यावरून चादर हळू हळू खाली सरकत होती. एक भयंकर किंकाळी फोडत विराज दरवाज्यावर हात आपटू लागला.

बाहेरच्या मुलांनी गडबडीने टाळा खोलत विराजला बाहेर काढले. बाहेर आल्या आल्या विराज पळत सुटला. ओरडत किंचाळत तो इस्पितळाच्या बाहेर गेला. काही मुले त्याच्या मागे धावली तर काही मुले फिदीफिदी हसत होती. 

विराज पैज हारला अशी चर्चा करीत मुले उभे होते. आतून त्यांचा मित्र सुखराम मुडदा म्हणून पलंगावर झोपणार होता त्याची वाट बघत...

बराच वेळ झाला सुखराम आतून बाहेर आला नव्हता तेव्हा मुले मुडदा घरात गेले. सुखराम चौथ्या पलंगावर चादर ओढून पडला होता. त्याला मुलांनी उठवला आणि बाहेर घेऊन आले.

मुलांनी मुडदा घराला टाळा लावून तेथून निघून गेले. सुखरामला आत काय काय घडले ते विचारण्यात आले तेव्हा त्याला कोणत्याच घटनेची पुसटशीही कल्पना नव्हती असे कळाले. विराज चे मुडदा घरात येणे, ओरडत किंचाळत बाहेर जाणे काहीच नाही. सुखराम जेव्हा मुडदा घरात जाऊन पलंगावर झोपला तेव्हा काही क्षणातच त्याला भयंकर थंडी वाजू लागली आणि काही कळायच्या आताच तो तेथे बेशुद्ध होऊन पडला होता. हे ऐकून मुलांची बोबडी वळली.

सुखराम जर तेथे बेशुद्ध होऊन पडला होता तर त्या शेवटच्या पाचव्या पलंगावर कोण...? 

Comments