दवबिंदू आणि गाढव
एका जंगलात खूप प्राणी राहत होते. त्या जंगलात गाढव पण राहत होते. एके दिवशी ते गाढव त्याच्याच नादात चालत होते आणि ते खूप उदास होते. सगळे प्राणी त्याच्या आवाजाची थट्टा करत होते. त्याला वाटत होते की, आपला आवाज मधुर व्हावा. तेवढ्यात रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधुर स्वर आला.
तो त्या गोड आवाजाच्या दिशेने पाठलाग करत करत एका नाकातोड्याजवळ पोहचला. नाकतोडा एका पानावर बसून गाणं गुणगुणत होता. तो आवाज ऐकून गाढवाला काही शांत बसवेना. गाढवाने त्याला विचारले, तू काय खातोस ? काय पितोस ? तुझा आवाज इतका गोड कसा? याचे रहस्य मला सांग.
नाकतोडा खूप खोडकर होता. तो गाढवाला चेष्टेत म्हणाला, "मी तर दवबिंदू पितो म्हणून माझा आवाज इतका मंजुळ आहे. जर तुला असा मंजुळ आवाज हवा असेल तर तुला पण हेच करावे लागेल !"
गाढवाला तर मधुर आवाज पाहिजे होता, त्याने नाकतोड्याचे बोलणे खूप गंभीरतेने घेतले. गाढवाने ठरवले की, आता दवबिंदूच प्यायचे. बाकी काहीच खायचे नाही.
हळूहळू गाढव खूप अशक्त होऊ लागले आणि शेवटी ते मरण पावले. म्हणूनच आपल्याला गाढवासारखे मूर्ख बनायचे नाही. कोणाचाही सल्ला विचार न करता अमलात आणू नये.
असे केल्यामुळे नुकसान आपलेच होते. म्हणूनच नेहमी स्वत: विचार करायला हवा.
तात्पर्य - ऐकावे जनाचे करावे मनाचे
Comments
Post a Comment