बळी
कोल्हापूर जिल्ह्यातील घाटात वसलेले एक छोटेसे गाव, सावरगाव. गाव तसे जेमतेम वस्ती असलेले. शहरापासून किमान दीड तासाच्या अंतरावर वसलेले. गावात अजून एस.टी चालू नव्हती झाली. तालुका बाजार अथवा कोल्हापुरात जाण्यासाठी चालतच किव्वा बैलगाडीने २-३ मैल कापून वेशीपर्यंत यावे लागत आणि तेथून एस.टी पकडून पुढे जावे लागे. गावात प्राथमिक शाळा सुरु झाली होती. जुन्या पिढीचे शिक्षण झाले नसल्याने अजूनही अनेक जुन्या रूढी परंपरा तसेच अंधश्रद्धा गावावर रूढ होत्या.
गावात मध्यभागी गावदेवीचे मंदिर होते. मंदिरासमोर मोठे झाड होते, तीच गावाची चावडी, येथे दररोज लोकांची ये जा चाले. झाडाभोवती मोठा कट्टा बांधला होता, तेथे गावाची सभा भरे, तसेच निवांत गप्पा मारीत बसण्याची ती सर्वांची आवडती जागा होती.
सकाळ झाली होती, गावात लोकांची वर्दळ चालू झाली होती. पाणी भरायला बायका, गडी माणसे घरातून बाहेर पडली होती. पाठीवर दप्तर घेऊन लहान मोठी मुल शाळेत निघाली होती. सकाळची लगबग थोडी कमी झाली, चावडीवर दोन-तीन माणस निवांत बसली होती. साधारण सकाळचे ८.३० वाजत आले होते.
नामा गावातच वाढलेला वीस बावीस वर्षाचा तरुण होता. लहानपणीच आई वडिलांचे छत्र डोक्यावरून हरवले होते. होते नव्हते ते सर्व मोठ्या काकाने गीळन्कृत केले आणि त्याच्या वाटेला बेवारशाचे जिने आले, कुणी दिले तर खावे नाहीतर असेच पडून राहावे असे जिने झाले. हळू हळू नाम्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो वेड्यासारखा एकट्यानेच बडबड करू लागला. लोक त्याला वेडा नाम्या म्हणू लागले.
तेव्हा सकाळी नाम्या चावडीवर येऊन बसला. नेहमीप्रमाणे स्वतःशीच बडबड चालू होती.
“माळावर माणूस मारलाय.... तिकड बगीतल म्या.... कसा मारला.... डोक्यातून रगात भायेर आलय सगळ....तिकड जाऊ नग....तुलाबी मारल......हा हा हा.....”, अशी असंबंध आणि अखंड बडबड त्याची चालू होती.
चावडीवरच्या माणसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हळू हळू माणसांची पांगापांग झाली. दुपारचे बारा वाजले होते. शाळा सुटली. बबन्या आणि त्याचे मित्र शाळेतून बाहेर पडले. बबन्या सातवीत शिकणारा १०-१२ वर्षाचा मुलगा.
“चला र माळावर जाऊया....कैऱ्या पाडाय...”, बबन्या मित्रांना बोलला.
बबन्या आणि त्याच्या मित्रांचा कैऱ्या तोडायचा तसा रोजचाच कार्यक्रम झाला होता. शाळेसमोरच्या मोठ्या पटांगणा पलीडके एक छोटी टेकडी लागत होती. ती चढून गेल्यावर साधारण १० मिनिटे चालून पुढे गावाचा माळ सुरु होत होता. तेथे लोकांच्या शेतजमिनी होत्या तसेच बराच विस्तीर्ण असा परिसर होता, झाडा झुडपांनी वेढलेला. सहसा लोक कामाशिवाय त्या परिसरात जात नसत.
बबन्या आणि त्याचे मित्र उड्या मारत, दंगा मस्ती करत माळावर पोचले. शेतालगतच्या एक दोन झाडावरचे राहिले साहिलेले आंबे त्यांनी काढले.
“आर... येवड्याच कैऱ्या आज...”, किश्या बोलला.
“च्यायला...चला थोड आत जाऊ....रानात लई झाड हायती....कैऱ्या काय चीचापण काडून आणूया...”, असे म्हणत बबन्या पुढे चालू लागला, तसे बाकीची मुलही त्याच्यामागून चालू लागली.
थोडं आत गेल्यावर, आंबे चिंचेची बरीच झाडे दिसली. सर्व मुल कैऱ्या चिंचा काढण्यात मग्न झालीत. बबन्याची नजर थोड्या दूर असलेल्या एका चिंचेच्या झाडावर पडली, तो पुढे गेला त्या झाडापाशी आला, दगड उचलण्यासाठी तो खाली वाकला आणि समोर त्याची नजर गेली, समोरील दृश्य पाहून त्याची बोबडी वळली, तो किंचाळला. त्याचा आवाज ऐकून बाकीचे दोघ तिघे तिकडे गेलीत आणि ते दृश्य पाहून सर्वांच्या छातीत धडकी भरली. समोर एका माणसाचा मृतदेह पडला होता. डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेली होती. धावत पळत सर्व जन तेथून बाहेर पडले.
माळा जवळच्या जंगलात पोलीस जमले होते. मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेहाची बरीच छिन्नविच्छिन अवस्था झाली होती. मृतदेहाची मरणोत्तर तपासाची अंतर्गत एक वेगळीच बातमी समोर आली ती म्हणजे त्या इसमाचा खून करून त्याच्या शरीरातील महत्वाचे अवयव काढून घेण्यात आले होते.
जागेचा पंचनामा झाला. पोलिसांनी त्यांची सूत्र जोरात हलवली. चौकशी दरम्यान त्या मृतदेहाची ओळख पटली. तो इसम सावरगावातीलच होता. त्याचे नाव रघुनाथ शेवाळे असे होते. त्याच्या घरी चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान असे समोर आले कि, रघुनाथ दोन दिवसांपूर्वी घरून तालुक्याला जाण्यासाठी निघाला होता. तालुक्याला इमारत बांधणीच्या एका कामासाठी तो चार पाच दिवस बाहेरच राहणार होता, पण अचानक त्याच्या घरी त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि घरी आक्रोश झाला. पोलिसांची चौकशी बरेच दिवस चालू होती. जंग जंग पछाडूनहि हवी तशी माहिती-पुरावे पोलिसांना मिळत नव्हते.
इतका भयंकर प्रकार गावात पहिल्यांदाच घडला होता. गावात भीतीचे वातावरण पसरले होते. बरेच दिवस निघून गेले.
दीड महिन्यानंतर
त्या दिवशी अमावस्या होती. शिवराज घरातून निघाला होता, त्याला कामानिमित्त तालुक्याला जायचे होते तसेच काहीदिवसांसाठी तो बाहेरच राहणार होता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. शिवराज पायी चालत निघाला होता. शाळेसमोरील पटांगण ओलांडून तो एका पायवाटेवरून चालत निघाला, काही वेळ चालल्यानंतर दुरून गावाचिः वेस दिसू लागली. आजूबाजूला घनदाट अंधार पसरला होता. सर्व घर मागे पडली होती. शिवराज चालत होता आणि अचानक मागून त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार झाला.
रात्र सरून गेली, सकाळी काही गावकरी मिळून माळरानात लाकूड आणायला निघाली होती. ते तिघे-चौघे रानात पोचले. जळणासाठी रानात लाकूड आणायला गेलेल्या त्यांना काय माहित कि त्याच्या दृष्टीस काही अभद्र असे पडणार होते.
रानातल्या त्याच चिंचेच्या झाडाखाली शिवराजचा मृतदेह पडला होता. छिन्नविछिन्न अवस्थेत. बाजूला एक मोठा दगड पडला होता. लाल लिंबू तसेच इतर काही चित्र-विचित्र वस्तू तेथे पडल्या होत्या. अगदी रघुनाथ शेवाळे प्रमाणेच शिवराजलाही आपला जीव गमवावा लागला.
पंचनामा झाला. पोलिसांची तपासचक्र चालू झाली. पोलिसांना तसेच गावकऱ्यांना कळून चुकले होते कि हा नरबळी देण्याचा भयंकर अघोरी असा प्रकार गावात सुरु झाला आहे.
घडलेल्या या प्रकारानंतर गावात भयंकर भीतीचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांना वेळीअवेळी बाहेर जाण्यास बंदी होऊ लागली. लहानच काय तर बाया-बापडेहि जीवाला घाबरून राहू लागले. गावात चित्र-विचित्र चर्चा होऊ लागल्या. कोणी म्हणे माळावरच्या रानात भुतखेत आहेत, आत्मा आहेत. घरात, चावडीवर याविषयी चर्चा रंगू लागल्या.
गावात जखूबाबा राहायचा. त्याचे झोपडीवजा घर वेशीपासून अलीकडे थोड्या अंतरावर होते. गावात त्याला सगळे घाबरून राहत असत. तसेच गावातील विचित्र प्रकारच्या अडचणी त्याच्या खऱ्या-खोट्या विद्येने दूर करीत असे त्यातून मिळणाऱ्या पैशाने त्याचा उदरनिर्वाह चालत असे.
त्या दिवशी रात्री जखूबाबा त्याचा घरात बसला होता, घराचे दार उघडेच होते. जखूबाबा दारासमोरच समोर बसला होता, दारात कोणीतरी आले होते, त्याने हाताने खून करत आत येण्यास सांगितले तशे ते जोडपे आत येऊन जखुबाबा समोर येऊन बसले. जाखुबाबाचे मंत्रोच्चार सुरूच होते.
काहीवेळ गेल्यानंतर....
“दोन बळी पाडले आहेत आणखी दोन बळीची गरज पडणार हाय...”, जखुबाबा बोलत होता.
“जखुबा... लई जोखीम हाय त्यात... आणि आता पोलीस गस्तीवर असत्यात... गावकरी सावध झाल्यात... तू सांगितल्या परमान दोन बळी दिल्यात... कदी गावनार गुप्तधन....”, समोरील व्यक्ती.
“जास्त शानपन करू नागोस...”, जाखुबाबा ओरडला.
“मी सांग्तुय त्यापरमान करा... आर त्यात तुमचाच फायदा हाय... हा... आन न्हाय केल तर काय होईल तुमास्नी चांगलाच म्हाईत हाय....एकदा सुरु केल्याल काम आस आर्ध सोडता याच न्हाय...हा...”, जाखुबाबा तीरसाठासारख बोलत होता.
झोपडीत चाललेल्या त्या अघोरी चर्चेत भंग पडला तो बाहेरील कसलाशा आवाजाने. आवाज खिडकीजवळून आला होता. सर्वांनी तिकडे पाहिले. एक लहान मुलगा तेथे उभा राहून सर्व ऐकत होता. तो बबन्या होता. आपण पाहिले गेलोय हे कळताच बबन्या तेथून पळत सुटला. ते जोडपे लगबगीने उठून जखुबाबाच्या झोपडीतून निघून गेले.
बबन्या घरी घाबरून बसला होता. बबन्याचा बाप त्याच्यासमोर बसला होता.
“आर बबन्या हे समद आपल्या भल्यासाठीच करतोय मी आन तुझी आई....”
“म्हंजे बा गावातल दोन खून तू आन आयन केल्यात....”, बबन्या.
“आर खून न्हाय...खून नग म्हणू.... बळी हाय त्यो.... त्याग अस्तुय त्यो....एक निवीद अस्तुय त्यो.... देवासाठी केलला.... तू अजून ल्हान हायस.... पर तुला सांगून ठेवतो.... गप गुमान रहा.... कुणालाबी यातलं कळता कामा नये...समजल... आर हे काम केल्यावर लई भरभराट हुईल आपली... तुला रोज नवी कापड घालय मिळतील... खायला चांगल चुंगल मिळल... काय न्हाय ते सार सार मिळल... आणि...”, बबन्याचा बाप विकट हसत बोलत होता, “आन तुझ्या मनातली पोरागीबी तुला मिळल....हा...हा...हा...”
बबन्या थोडा सावरला होता. बापाने दाखवलेल्या आमिषांना तो बळी पडला. याबद्दल त्याने कोणाकडेच चर्चा केली नाही.
काही दिवस निघून गेले. बबन्याच्या घरी आता तिसऱ्या बळीबद्दल चर्चा सुरु झाली होती. बबन्याला सर्व प्रकार माहित पडल्यापासून त्याच्या समोरच सर्व चर्चा होत असे. ठरल्याप्रमाणे तिसऱ्या बळीची सर्व तयारी झाली होती.
यावेळेस पाळी होती हनमंतची. हनमंत गावातलाच तिशीतला तरुण होता. त्याला तालुक्याचे काम मिळाले होते. लगबगीने तो घरातून निघाला. इकडे बबन्याच्या बापाने सर्वप्रकारची खबरदारी घेतली होती तसेच तयारीची केली होती. घरातून निघालेला हनमंत वेशीपर्यंत पोचलाच नाही, खरे इप्सित साध्य झाले ते बबन्याच्या बापाचे गावात तिसरा बळी गेला होता.
हनमंतच्या घरात आक्रोश झाला होता तर बबन्याच्या घरी आनंद साजरा झाला.
पोलीसहि पुरते गोंधळून गेले होते. एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोवर दुसरा खून पडत होता. सर्व खुनामागे फक्त एक सामान्य धागा होता तो म्हणजे, हे खून म्हणजे कोणीतरी आपले अघोरी इप्सित साध्य करण्यासाठी दिलेले हे बळी होते, तसेच मृताच्या शरीरातून अवयव काढले जात होते. पण हे कोण करत होते याबाबतीत पोलीस आणि गावकरी पूर्णपणे अंधारात होते.
जखूबाबाच्या झोपडीत बबन्याचा बाप आणि त्याची आई बसले होते.
“तीन बळी पार पडल्याती आता शेवटचा आणि एक पायजे हाय...बास...”, जाखुबाबा.
“जखुबा...पर धन कदी गावायच....”, बबन्याचा बाप.
“मिळल मिळल.... घाई करू नग.... आर देवाच काम हाय हे.... कोपबीप झाला म्हंजी कायच मिळायचं न्हाय... वाटून दिल्याली काम करायची.... फळ आपोआप मिळत्यात....”, जखुबाबा.
शेवटचा बळी द्यायची चर्चा बबन्याच्या घरात सुरु झाली होती. शेवटच काम आणि त्यानंतर मिळणार गुप्त धन या सर्वाचा विचार करून बबन्याचा बाप आणि आई उत्साहात होते.
बबन्या मधल्या घरात पुस्तक वाचत बसला होता. स्वयंपाक घरात त्याचे आई वडील बोलत बसले होते.
“शकू आता शेवटचा बळी दिला म्हंजी काम झाल बग आपल...”
“व्हय... मला तर नुसता पैसाच पैसा दिसतुया... पर आता शेवटचा बळी कुणाचा द्याचा...”
“आता बळी मारुती झगड्याचा...”
हे बोलण ऐकून बबन्या बाहेर बेचैन झाला, पण तो गप्प राहिला, अभ्यासात बबन्याचे लक्ष लागले नाही.
तो दिवस उजाडला होता. सर्व तयारी झाली होती.
संध्याकाळचे सात वाजले होते. मारुती झगडे घरातून बाहेर पडला. ठरल्या प्रमाणे शाळेसमोरील पटांगण ओलांडून मारुती पुढे निघाला. छोट्या पायवाटेने मारुती चालत पुढे निघाला. त्याच्या मागावर कोणीतरी होते याचा मागमूसहि त्याला नव्हता. एका झाडामागे बबन्याचा बाप लपून बसला होता. मारुती पुढे चालत होता, वेळ आली होती. बबन्याचा बाप चोर पावलांनी दबकत दबकत त्याच्या मागून गेला, डोक्यात प्रहार करणार इतक्यात...
“जागेवरच थांब नायतर गोळी घालीन”
पोलीस आले होते, अचानक आलेल्या पोलिसांमुळे बबन्याचा बाप भांबावून गेला. तेथून निसटण्याचा त्याने प्रयत्न केला पण हवालदार आणि पोलिसानी त्याला पकडून त्याच्या मुसक्या बांधल्या.
बबन्या समोर उभा होता. पोलिसांना बबन्यानेच सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.
“बा... तू केल ते लई वंगाळ केल बा... तेवा तुज आन आयच बोलन ऐकल... पुढचा बळी मारुती काकाचा... ह्ये ऐकून जीव ऱ्हायला न्हाय.... मारुती काकाचा बळी तू दिला असता तर माझ्या मित्राच किश्याच काय झाल आसत....त्याच्या आयन तर रडून रडून जीव दिला असता.....रातभर या इचारान झोप लागली नाय मला...पर मनाशी पक्क ठरिवल मारुती काकाला मारू द्याच न्हाय...”, बबन्या रडत होता.
बबन्याच्या बापाला पोलीस घेऊन गेले. त्याच्या या सर्व दुष्कृत्यात सहभागी असलेल्या बबन्याची आईला आणि जखूबाबालाही अटक करण्यात आली.
चौकशी अंतर्गत एक फार विचित्र आणि मन भांबावून टाकणारी गोष्ट समोर आली ती म्हणजे या सर्व खून अथवा बळी सत्रामागील मुख्य सूत्रधार गावातील एक नामांकित व्यक्ती होती. या सर्व गोष्टींमागे गावचा सरपंच मुख्य सूत्रधार होता.
सरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरपंचानी पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्नही केला पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही, सरते शेवटी सरपंचानी आपला गुन्हा मान्य केला आणि सर्व गोष्टींचा खुलासा केला.
गावातल्या माणसांचे गेलेले बळी म्हणजे सरपंचाच्या फायद्यासाठी केलेले अक्षम्य आणि अघोरी गुन्हे होते. यासाठी सरपंचाने जखूबाबाची मदत घेतली होती. जखूबाबाने या देवभोळ्या आणि परिस्थितीने गांजलेल्या माणसांना गुप्तधनाचे आमिष दाखवून बळी घेण्यास सांगितले आणि मुळात त्यामागे गुप्तधन, खजिना असं काहीहि मिळणार नव्हत, खरी संपती मिळणार होती ती सरपंचाला. खून केलेल्या माणसाचे अवयव रातोरात विकले जात होते.
बळी देण्यासाठी ठरवलेल्या माणसाला फितावण्याचे काम सरपंचाच्या माणसांचे होते. त्यांना तालुक्याला चांगल काम देण्याचे आमिष दाखवले जात होते. कशाना कशा प्रकारे संध्याकाळी घरून निघण्यास सांगायचे आणि तिथून पुढे काम बबन्याच्या बापाचे होते.
या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि प्रकरणावर पडदा टाकला. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
अशा प्रकारे गावातील घडलेल्या या मोठ्या खून सत्राचा पडदा फाश झाला. गावकरयांनाहि एक मोठा धडा मिळाला होता. असे बळी देऊन अथवा दुसऱ्याचे घर उद्वस्थ करून कधीच कोणाच भल होत नाही.
समाप्त
Comments
Post a Comment